17September2021

Vrutt Kesari

एक नजर

'उद्धव ठाकरे माझेही मुख्यमंत्री; अरेतुरेची भाषा खपवून घेणार नाही'

औरंगाबाद:शिवसेना आणि आमचा पक्ष एकमेकांचे विरोधक आहोत. मात्र उद्धव ठाकरे हे माझेही मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या विरोधात अरेतुरेची भाषा सहन करणार नाही, असे वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. कंगना राणावत हिलाही अशी भाषा योग्य नसल्याचे त्यांनी बजावले. ( Imtiaz Jaleel Slams Kangana Ranaut )

राज्यात अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. मुंबई महानगर पालिकेने अभिनेत्री कंगना राणावत हिच्या कार्यालयातील बेकायदा बांधकामावर कारवाही केली. या कारवाईनंतर कंगना राणावत हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अरेतुरेची भाषा वापरली. या अरेतुरेच्या भाषेबाबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.

शिवसेना हा पक्ष जरी आमचा राजकीय विरोधक असला तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे आणि माझेही मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या विरोधात अशा प्रकारची भाषा वापरणे अयोग्य आहे. अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांबद्दल वापरणे केव्हाही अस्वीकारार्ह आहे, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

दरम्यान, शिवसेना विरुद्ध कंगना वाद विकोपाला गेला आहे. कंगनाने मुंबईबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याने व मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानशी केल्याने या वादाची ठिणगी पडली. त्यात मुंबई पालिकेने बुधवारी कंगनाच्या आलिशान कार्यालयावर बुलडोझर चालवल्याने तणाव अधिकच वाढला. मनाली येथून मुंबईत परतत असतानाच ही कारवाई झाल्याने त्यावर कंगनाचा तीळपापड झाला. पालिका आणि सरकारवर हल्ला चढवताना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा तिने एकेरी उल्लेख केला. त्यावर सर्वच पक्षांमधून आक्षेप घेतला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांनी यावरून कंगनाला फटकारले तर कंगनाला संरक्षण देण्याची हमी देणारे आरपीआय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही कंगनाच्या या विधानाचे समर्थन केले नाही. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख कुणी करणार असेल तर त्याचे मी समर्थन करणार नाही, असे आठवले यांनी आज कंगनाच्या भेटीनंतर सांगितले. या सगळ्या पार्श्वभूमीवर एमआयएम या शिवसेनेचा कट्टर विरोधक असलेल्या पक्षानेही कंगनाविरोधात सूर आळवल्याने कंगना या मुद्द्यावर अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख तिला चांगलाच महागात पडणार असे दिसत आहे.

 

मुंबईत कंगनाविरुद्ध तक्रार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या कंगना विरोधात मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात आज तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीबरोबरच कंगनाचे काही ट्विटही पुरावा म्हणून जोडण्यात आले आहेत. तक्रारीत तिच्या एका व्हिडिओचाही उल्लेख करण्यात आला आहे. अॅड. नितीन माने यांच्यामार्फत विक्रोळी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. कलम ४९९ अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे माने यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय

महिलांची सखी

आमच्या सोबत रहा

भारताची लोकसंख्या